मालवण ग्रामीण रुग्णालयाची ३० बेड वरून ५० बेड क्षमता वाढविण्यास मान्यता

मालवण ग्रामीण रुग्णालयाची ३० बेड वरून ५० बेड क्षमता वाढविण्यास मान्यता

*कोकण Express*

*मालवण ग्रामीण रुग्णालयाची ३० बेड वरून ५० बेड क्षमता वाढविण्यास मान्यता*

*डॉक्टर, सुरक्षा रक्षक यांची प्रलंबित वेतने तात्काळ देण्याच्या सूचना*

*आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रॉवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक*

*आमदार वैभव नाईक यांची माहिती*

आमदार वैभव नाईक सातत्याने पाठपुरावा करत असलेल्या मालवण ग्रामीण रुग्णालयाची ३० बेड वरून ५० बेड क्षमता वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. आज सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रॉवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील शासकीय निवासस्थानी बैठक संपन्न झाली.त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. तसेच मालवण ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय म्हणून दरजोन्नती देण्याबाबतचा प्रस्ताव व रुग्णालय उभारणीचे अंदाजपत्रक तात्काळ सादर करण्याच्या सूचना आरोग्य विभागाचे अधिकारी व सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच जिल्ह्यातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व सुरक्षा रक्षक यांची प्रलंबित वेतने तात्काळ देण्याच्या व आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत अशी माहिती आ.वैभव नाईक यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुका हा पर्यटन दृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो. त्यादृष्टीने याठिकाणी सर्व सोयी सुविधा उभारण्यावर आमदार वैभव नाईक यांनी भर दिला आहे. मालवण ग्रामीण रुग्णालयात मालवण बरोबरच देवगड, वेंगुर्ले येथील रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. त्यांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय होण्यासाठी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा सुरु आहे. त्यांच्या पाठपुराव्यानुसार आज याप्रश्नी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रॉवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक संपन्न झाली. बैठकीत त्याबाबत चर्चा करून मालवण ग्रामीण रुग्णालयाची ३० बेड वरून ५० बेड क्षमता वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

यावेळी आरोग्य सहसंचालक श्री. आंबर्डेकर, आरोग्य उपसचिव श्री. बलकवडे, आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, सचिन बडवे, सुरक्षा रक्षक प्रमुख श्री. गुरव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!