*कोकण Express*
*जिल्हाधिकार्यांनी केली पत्रकार भवनाच्या कामाची पाहणी*
*पत्रकार भवनाची पाहणी करताना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, बाळ खडपकर, संजय वालावलकर व विनायक जोशी*
*सिंधुदुर्गनगरी ःः*
सिंधुदुर्गनगरी येथील आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन इमारतीच्या सध्या सुरू असलेल्या कामाची पाहणी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, कार्यकारिणी सदस्य बाळ खडपकर, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर व अभियंता विनायक जोशी उपस्थित होते.
सध्या या पत्रकार भवनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सिव्हील वर्क पूर्ण झाले असून विद्युत पुरवठा व साऊंड सिस्टमचे काम सुरू आहे. फर्निचरचे काम आता सुरू होणार आहे. या सर्व कामाची पाहणी करून त्याची सर्व माहिती जिल्हाधिकार्यांनी जाणून घेतली. भवनाच्या इमारतीमध्ये जिथे बाळशास्त्री जांभेकर यांचा पुतळा बसविणार आहे, त्या जागेचीही जिल्हाधिकार्यांनी पाहणी केली.
पुतळा विषयक जिल्हास्तरावर समिती असून या समितीची लवकरच बैठक बोलावून पुतळा उभारणीला मंजुरी दिली जाईल. तसेच बाळशास्त्री यांचा एक फोटो कला संचालनालयाकडे पाठवून त्याचीही मंजुरी घेण्यात येईल, अशी माहिती संघाच्या पदाधिकार्यांना दिली. तसेच सर्व कामे मुदतीत पूर्ण करा अशा सूचनाही जिल्हाधिकार्यांनी अधिकार्यांना दिल्या.
दरम्यान माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनीही पत्रकार भवनाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय चिटणीस नंदकिशोर महाजन, कार्यवाह उमेश तोरसकर उपस्थित होते. आमदार केसरकर यांनीसुद्धा या कामाबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली.