फोंडाघाट महाविद्यालयात हृदयरोग उपचार या विषयावर कार्यशाळा संपन्न

फोंडाघाट महाविद्यालयात हृदयरोग उपचार या विषयावर कार्यशाळा संपन्न

*कोकण  Express*

*फोंडाघाट महाविद्यालयात हृदयरोग उपचार या विषयावर कार्यशाळा संपन्न*

*दैनंदिन व्यायाम व सकस आहार यांनी हृदयरोग टाळता येतो डॉ. अनिल मस्के*

*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*

येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये हृदयरोग व उपचार या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. सदरची कार्यशाळा एन.एस.एस. विभाग व आय. क्यू ए. सी. विभागामार्फत आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयतील श्वसनविकार तज्ञ डॉ. अनिल मस्के उपस्थित होते. ते आपल्या मनोगतात म्हणाले की, रक्त शुद्ध करणारे माध्यम म्हणजे फुप्फुस हा अतिशय नाजूक भाग आहे. करोना फुप्फुसावर अटॅक करतो व फुफुसांची लवचिकता कमी होऊन ते कठीण होत जाते म्हणजेच “लंग फायब्रोसिस” होते. अशा काळात माणसाला शुद्ध ऑक्सिजन मिळत नाही. कोरोना झालेवर लगेच सिटीस्कॅन करणे हे समीकरण नाही तर ते रुग्णांच्या लक्षणांवर व आजाराची तीव्रता यावर अवलंबून असते. काेराेना झाल्यानंतर लंग फायब्रोसिस झालेल्या लोकांनी घाबरण्याचे कारण नाही कारण तो कालांतराने बराही होतो.

हृदयरोग हा अनुवंशिकतेवर तसेच आहार, विहार तसेच ताणतणाव यावर अवलंबून आहे. व्यसन व ताणतणावामुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

डॉ. अनिल मस्के यांनी दमा व दम्याचे प्रकार तो कोणत्या कारणाने होतो दमा होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी, दमा झाल्यानंतर कोणते उपचार घ्यावेत याची माहिती दिली. ऍलर्जी म्हणजे एखादी गोष्ट आपल्या शरीराला सूट न होणे. जी गोष्ट सूट होत नाही तिला लांब ठेवणे हाच उपाय असतो. फुप्फुसाचे आजार हे हवेत होणाऱ्या बदलांमुळे होतात ते टाळणे अवघड असले तरी अशक्य नाही.

अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत म्हणाले की, बर्‍याच दिवसांनी ताण कमी करणारे व्याख्यान लाभले. आम्हाला सगळं कळतं पण वळत नाही .तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे आपण अनेक आजारांना बळी पडतो. आजच्या व्याख्यानामुळे आपण सजग होऊया.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बालाजी सुरवसे यांनी तर आभार डॉ. राजाराम पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!