*कोकण Express*
*वेंगुर्ले शाळा नं २ पंचायत समितीत भरविणार*
*तौक्ते वादळात पडलेले वडाचे झाड अद्याप शाळेवर;पालक आक्रमक*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
मे महिन्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळात वेंगुर्ला शाळा नं. २ या इमारतीवर वडाचे झाड पडून नुकसान झाले होते. हे झाड काढण्याबाबत वारंवार लेखी पत्राद्वारे कळवून सुद्धा संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. मात्र, मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी आज व्हरांड्यात शाळा सुरु केली आहे. याचीही दखल न घेतल्यास यापुढे शाळा पंचायत समिती कार्यालयात भरविण्यात येईल असा इशारा पालकांनी दिला आहे. शासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पालकांनी ४ ऑक्टोंबरला गटविकास अधिकारी उमा घारगे- पाटील यांची भेट घेऊन त्यांना ते धोकादायक झाड तोडून शाळा सुस्थितीत करणे बाबत निवेदन सादर केले होते. तसेच पालकमंत्री उदय सामंत यांनीही वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयाला सदर झाड तोडणे बाबत सूचना केल्या होत्या. मात्र, वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील या पडलेल्या झाडाच्या वरवर फांद्या तोडून धोकादायक मूळ झाड इमारतीवर तसेच आडवे आहे. अशा वेंगुर्ला शाळा क्र.२च्या धोकादायक इमारतीमध्ये मुलांना शिकण्यासाठी न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला होता. परंतु,शाळेत न पाठविल्यास मुलांचे शैक्षणिक नुकसान होईल म्हणून आजपासून पालकांनी शाळा व्हरांड्यात सुरु केली आहे. दरम्यान, याबाबत येत्या ८ दिवसात सकारात्मक निर्णय न घेतल्यास पालकांनी ही शाळा पंचायत समिती कार्यालयात भरविण्यात येईल असा इशारा दिला आहे. यावेळी शिक्षक पालक संघ अध्यक्ष संजय पिळणकर, उपाध्यक्ष अश्वेता माडकर, नगरसेवक श्रेया मयेकर, धर्मराज कांबळी, साक्षी प्रभूखानोलकर, मसुरकर, निलेश पाटील, महेश गावकर, कैवल्य पवार, राजन गावडे, शरद मेस्त्री, महेंद्र मातोंडकर, प्रशांत आजगावकर, मुख्याध्यापक जाधव, कर्पूगौर जाधव, निना गार्गी, राजश्री भांबर यांच्यासहीत अन्य पालक यावेळी उपस्थित होते. दरम्यान शाळेच्या इमारतीचा एक भाग धोकादायक आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावा अशी मागणी पालकांकडून होत आहे. फोटोओळी – शाळेवरील झाड न तोडल्यामुळे वेंगुर्ला शाळा नं.२च्या मुलांना शाळेच्या व्हरांड्यात बसवून शाळा सुरु केली.