कविवर्य आ.सो.शेवरे स्मृती साहित्य जागर 26 रोजी कोर्लेला

कविवर्य आ.सो.शेवरे स्मृती साहित्य जागर 26 रोजी कोर्लेला

*कोकण  Express*

*कविवर्य आ.सो.शेवरे स्मृती साहित्य जागर 26 रोजी कोर्लेला*

*काव्य पुरस्कार वितरण आणि खुले कविसंमेलन*

*एस के फाउंडेशन आणि कोर्ले ग्रामस्थांतर्फे आयोजन*

*कणकवली  ः प्रतिनिधीी*

‘एस. के. फाउंडेशन’ कोर्ले (देवगड) आणि कोर्ले ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कोर्ले गावचे सुपुत्र कविवर्य आ.सो.शेवरे यांच्या स्मृतिदिनी कोर्ले येथे मंगळवार 26 ऑक्टोंबर रोजी दुपारी 3 वा. आ.सो.शेवरे साहित्य जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात कविवर्य आ.सो. शेवरे काव्यपुरस्कार वितरण आणि खुले कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.तरी जिल्ह्यातील कवींनी कविता वाचनासाठी कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन एस. के. फाउंडेशन’चे अध्यक्ष सचिन कोर्लेकर आणि कोर्ले गावचे सरपंच विश्वनाथ खानविलकर यांनी केले आहे.
यावेळी पुणे येथील कवी देवा झिंजाड यांच्या हार्मिन्स प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘सर्व उलथवून टाकलं पाहिजे’ या काव्यसंग्रहाला कविवर्य आ.सो.शेवरे काव्य पुरस्कार शेवरे यांच्या पत्नी मायावती शेवरे व शालिनी कृष्णा कोर्लेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग विद्रोही साहित्य चळवळीचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, फुले-आंबेडकर दर्पण संस्थेचे अध्यक्ष राजेश कदम, साहित्य चळवळीतील कार्यकर्ते विनायक सापळे, अच्युत देसाई, उपस्थित राहणार आहेत. कवी शेवरे यांनी ऐंशीच्या दशकापासून तळकोकणात परिवर्तन साहित्य चळवळीला प्रारंभ केला. त्यांच्या पहिल्याच ‘गांधारीची फुले’ या काव्यसंग्रहाने मराठी साहित्याचे लक्ष वेधून घेतले. या संग्रहाला त्याकाळी अ. भा. साहित्य संमेलनातर्फे देण्यात येणारा कविवर्य बा. सी. मर्ढेकर पुरस्कारही प्राप्त झाला होता. त्यानंतर निघालेल्या त्यांच्या दोन संग्रहानेही जाणकार रसिकांचे लक्ष वेधून घेतले. सुमारे चाळीस वर्षे विद्रोही साहित्य चळवळीत कार्यरत राहताना गटातटापासून दूर राहून निष्ठेने त्यांनी काव्यलेखन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिवर्तन विचार मांडणाऱ्या सर्व स्तरातील कवीना सोबत घेऊन त्यांनी विविध उपक्रम राबविले. ‘प्रसंवाद’ वाड:मयीन नियतकालिकाची निर्मिती केली. या त्यांच्या कर्तृत्वामुळे कोर्ले गावाचेही नाव सर्वदूर पोहोचले. या सर्व पार्श्वभूमीवर कोर्ले गावातील एस. के. फाउंडेशनतर्फे आणि गावातील नागरिकांतर्फे सदर आ.सो.शेवरे स्मृती साहित्य जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही श्री कोर्लेकर आणि श्री खानविलकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!