*कोकण Express*
*पंचायत समितीच्या भ्रष्टाचारी कारभाराची पोलखोल केल्याने प्रकाश पारकर सैरभैर*
*शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांचा पलटवार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली पंचायत समितीच्या भ्रष्टाचारी कारभाराची पोलखोल केल्याने प्रकाश पारकर सैरभैर झाले असुन वस्तुस्थितीवर न बोलता सभापतींची तळी उचलून आमच्यावर बेताल आरोप करीत आहेत. त्यावेळी केलेल्या खोट्या तक्रारीमुळे न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली आहे. परंतु आमदार नितेश राणेंच्या विरोधात मे, २०१७ मध्ये सांताक्रूझ पोलीस स्टेशन येथे खंडणीचा गुन्हा दाखल आहे, याचीही माहिती घेऊन पारकरांनी बोलावे, नाहीतर भाजपात किती खडणीखोरांचा भरणा झाला आहे याचीही यादी आम्हाला जाहीर करावी लागेल, असा पलटवार शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी पं. स. उपसभापती प्रकाश पारकर यांच्यावर केला आहे.
बिनबुडाचे आरोप करून पंचायत समितीच्या दारातील भ्रष्ट्राचार लपविण्याचा प्रयत्न पारकर बुवा करीत आहे. जिल्हा परिषदेचे उपअभियंता सुतार यांनीच सभापतींनी आगाऊ काम केल्याचे अनेकवेळा सांगितले आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या अंगणात झालेल्या कामाचा खुलासा सभापतींनी अगोदर करावा आणि नंतरच टीका करावी. त्यामुळे भ्रष्टाचार कोण करतय, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. काम अगोदर आणि टेंडर नंतर याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे आणि आम्ही केलेले आरोप पारकरांनी खोटे असल्यास सिध्द करावे. नाहीतर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे आव्हानही शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी दिले आहे.