आमदारांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा दहशतवाद दिसला नाही का

आमदारांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा दहशतवाद दिसला नाही का

*कोकण Express*

*आमदारांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा दहशतवाद दिसला नाही का…?*

*विजय केनवडेकर ; जबरदस्तीने व्यवसाय बंद करणाऱ्या महाविकास आघाडीचा केला निषेध…*

*मालवण ः प्रतिनिधी*

परराज्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावरून महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी दादागिरी करत अनेकांना दुकाने बंद करण्यास लावली. परजिल्ह्यातून आलेल्या आलेल्या भाजी विक्रेत्यांची भाजी तसेच अन्य साहित्य उलथवून टाकले या प्रकाराचा भाजपा जिल्हा व्यापार उद्योग आघाडी व भाजपच्यावतीने तीव्र निषेध करत आहोत. शहरातील व्यापार्‍यांना जबरदस्तीने व्यवसाय बंद करण्यास सांगणे हे निषेधार्ह असून दहशतवादाचा कांगोरा पिटणार्‍या आमदारांना आज हा पदाधिकार्‍यांचा दहशतवाद दिसला नाही का? असा प्रश्‍न भाजपाचे प्रभारी शहराध्यक्ष विजय केनवडेकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक गणेश कुशे, दीपक पाटकर, विजय चव्हाण, पंकज पेडणेकर आदी उपस्थित होते. श्री. केनवडेकर म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीने दुसर्‍या राज्यातील शेतकर्‍यांचा कळवळा घेत आज महाराष्ट्र बंद पुकारला. इथल्या शेतकर्‍यांना न्याय देण्यास त्यांना वेळ नाही. या बंदच्या पार्श्‍वभूमीवर आज कणकवलीत आमदार वैभव नाईक यांच्यासमोरच व्यापार्‍यांना जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडण्यात आले. ज्यांनी दुकाने बंद केली नाही त्यांच्या दुकानाच्या शटरवर लाथा मारण्यात आल्या. शहरातील सागरी महामार्ग येथे आठवडा बाजारात आलेल्या भाजी विक्रेत्यांनी आपला व्यवसाय बंद ठेवला नाही म्हणून त्यांची भाजी अन्य साहित्य फेकून देण्यात आले. आमदार सातत्याने दहशतवादाबाबत आरोप करतात तर मग आज त्यांना त्यांच्या पदाधिकार्‍यांचा दहशतवाद दिसला नाही का?

गेली दोन वर्षे कोरोना महामारीच्या काळात व्यापार्‍यांचे मोठे हाल झाले. त्यांची वीज बिले माफ करण्याचे आश्‍वासन देण्यात आले प्रत्यक्षात चक्रवाढ व्याज लावून बिले वसूल करण्यात आली. त्यामुळे व्यापार्‍यांना बंद पाळण्यास सांगण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. आज घडलेल्या प्रकाराचा आम्ही भाजपा व्यापार उद्योग आघाडी व भाजपाच्यावतीने तीव्र निषेध करत आहोत. तोक्ते चक्रीवादळात नुकसानग्रस्तांना अद्याप न मिळालेल्या भरपाईबाबत तसेच शहर विकास आराखड्याच्या प्रश्‍नासन शहरातील अन्य प्रश्‍नाबाबत त्यांनी आवाज उठविणे आवश्यक असताना ते करताना महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी दिसत नाही मग आता ही बंदची नौटंकी कशासाठी? असा प्रश्‍नही श्री. केनवडेकर यांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला आमचा विरोध नाही. मात्र या बंदमध्ये जर हुकुमशाही, दडपशाही, दंडुकेशाही वापरली जात असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. आठवडा बाजारात व्यवसायासाठी आलेल्या विक्रेत्यांचे साहित्य फेकून देणे हे योग्य नाही. ज्यांनी ही प्रकार केला आहे त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी आपली मागणी असल्याचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी सांगितले. आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर हे व्यापार्‍यांना दुकाने बंद करण्यासाठी गयावया करत होते. मात्र व्यापार्‍यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आपला व्यवसाय सुरूच ठेवत त्यांना त्यांची पत दाखवून दिल्याची टीका गटनेते गणेश कुशे यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!