*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा*
*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. १० ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याच्या दृष्टीने प्रबोधन करण्यात आले.
अनेक प्रकारच्या विषमतेमुळे मानसिक आरोग्य बिघडते. यात जगात शंभर कोटी एवढी लोकसंख्या या आजाराने त्रस्त आहे. तर एकूण लोकसंख्येच्या १/७ एवढी लोकसंख्या डिप्रेशनमध्ये जाते. स्किझोफ्रेनिया सारखा आजार माणसाचं वीस वर्ष एवढे आयुष्य कमी करतो. आजाराचे प्रमाण व उपचार याच्या व्यस्ततेमुळे हा आजार वाढतो आहे. बऱ्याचदा रस्त्यावर हे रोगी फिरताना दिसतात. हा आजार स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो. मानवीमूल्याची हेळसांड हे या आजाराचे मूळ कारण असून आपण फक्त शारीरिक व्याधींना आजार मानतो. परंतु ‘परिपूर्ण शारीरिक, मानसिक व सामाजिक संपन्न अवस्था म्हणजेच आरोग्य’ अशी व्याख्या वैद्यकशास्त्रज्ञ करतात . मानसिक आजाराची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून साधारणपणे 2025 नंतर जगात सर्वात जास्त रुग्ण या आजाराचे दिसतील, असे तज्ञांचे मत आहे. मानसिक आजाराला आजार न मानणारा आपला समाज असून मानसिक आरोग्यावरील गुंतवणूक ही पाच पटीने जास्त परतावा देते. काही मानसिक आजाराचा शेवट आत्महत्या करण्यात होतो. आजाराची सुरुवात फार पूर्वीच झालेली असते, परंतु वेळीच आपण लक्ष दिले नाही तर त्याचा शेवट ही आत्महत्या असते. असे आपल्या भाषणात प्रा. विनोदसिंह पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, मानसिक आरोग्य ही स्वतःची जबाबदारी आहे. मनाचे कार्य संतुलित असणे म्हणजेच मानसिक आरोग्य योग्य असणे आणि त्याचे कार्य असंतुलित असणे म्हणजे मानसिक आजार असणे. जीवनाचा हेतू निश्चित की अनिश्चित हे मानसिक आजाराचे स्वरूप ठरवतो. सुखी आणि समृद्ध जीवन जगणे हे एकच उद्दिष्ट सर्वांचे असते. भौतिक सुविधांचे खरे मूल्य समजणे म्हणजे सुख. आपल्या जीवनाची सुस्पष्टता असली पाहिजे. आणि ती जर नसेल तर आपण कधीच निरंतर सुखापर्यंत पोहोचू शकणार नाही. असे प्रतिपादन याप्रसंगी प्रमुख व्याख्याते प्रा. विनोद पाटील यांनी केले.
अध्यक्षस्थानावरून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत यांनी समुपदेशन कक्षाचे कौतुक केले. आज समाजाला असणारी मनाच्या आरोग्याची गरज ओळखली आहे. गेली दीड वर्षे आपण याच तणावातून जात आहोत. या काळात आलेल्या परिस्थितीत मानसिक आरोग्याची फार गरज आहे. अशा भयावह स्थितीत आपण स्थिर राहणे गरजेचे आहे. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य सांभाळणे हे एक आव्हानच आपल्यासमोर आहे. अस्वस्थता हे सुद्धा एक मानसिक आरोग्याचे लक्षण आहे. शरीराच्या व्यायामाबरोबरच मनाचा व्यायाम सुद्धा गरजेचे आहे . असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

