पत्रकारांची गळचेपी व भेदभाव करणाऱ्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी न झाल्यास निदर्शने व आंदोलन करणार

पत्रकारांची गळचेपी व भेदभाव करणाऱ्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी न झाल्यास निदर्शने व आंदोलन करणार

*कोकण Express*

*पत्रकारांची गळचेपी व भेदभाव करणाऱ्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी न झाल्यास निदर्शने व आंदोलन करणार..*

*तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माहीती जनसंपर्क अधिकारी व कोकण आयुक्त यांच्यासह जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर..*

*युट्युब चॅनेल धारक व सोशल मीडिया पत्रकारांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांची मागणी..*

*सिंधुदुर्ग:-*

जिल्ह्यातील चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाच्या मुद्द्यावरून जिल्हा प्रशासन आणि युट्युब चॅनेल धारक व सोशल मीडिया पत्रकार यांच्यातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वादाला जिल्हा माहिती अधिकारी व माहिती सहाय्यक जबाबदार असून पत्रकारांमध्ये भेदभाव करण्याचे काम हे दोन्ही अधिकारी करत आहे. पत्रकारांसाठी त्रासदायक ठरलेल्या अशा निकृष्ट अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करून त्यांच्या जागी आदर्श अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अन्यथा येत्या काळात जिल्हा माहिती कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करणार असल्याबाबतच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माहीती जनसंपर्क अधिकारी मंत्रालय दिलीप पांढरपट्टे, कोकण आयुक्त, सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी आज ई-मेलद्वारे पाठवले. त्यापैकी ‘आपला ईमेल मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त झाला असून तो पुढील कार्यवाहीसाठी माहिती व जनसंपर्क विभागास पाठविण्यात आला आहे’, असा तात्काळ प्रतिसाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळाला आहे.

जिल्ह्यातील चिपी विमानतळ उद्घाटन ९ ऑक्टोबर २०२१ रोजी होत आहे. या विमानतळाच्या उद्घाटनासाठी जिल्ह्यातील पत्रकारांना प्रवेश न देण्याची भूमिका जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व माहिती सहाय्यक हेमंतकुमार चव्हाण यांनी घेतलेली आहे. यासंदर्भात आम्ही आंदोलन तर करणारच आहोत. मात्र जिल्ह्यातील पत्रकारांवर सातत्याने गळचेपीचे धोरण व भेदभाव करणाऱ्या जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व माहिती सहाय्यक हेमंतकुमार चव्हाण यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन तातडीने बदली करुन त्यांच्या जागी पत्रकारांशी सौजन्याने वागणाऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध समस्यांबाबत लक्ष न देता उलट त्रास देण्याची भूमिका सदर दोन्ही अधिकारी करत आहेत. त्यामुळे या दोन अधिकाऱ्यांची बदली होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. या पत्राची तातडीने दखल घेऊन या दोन्ही अधिकाऱ्यांची ताबडतोब उचलबांगडी करावी. अन्यथा पुढील काळात जिल्हा माहिती कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!