*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयात गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी!*
*”महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांची प्रेरणा लोकशाही बळकट करेल.” डॉ. सतीश कामत*
*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोडाघाटमध्ये सांस्कृतिक विभागाच्यावतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ सतीश कामत होते. सुरवातीला त्यांनी महामानवाना अभिवादन करून आपल्या मनोगतात त्यांनी या महनीय व्यक्तींच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा परामर्श घेतला. गांधीजींच्या कर्तुत्वाने देशाला पुढे नेले. गांधीवाद चिवट आहे. गांधीजींच्या कार्याचा अभ्यास नेल्सन मंडेलांनी केला, त्यातच त्यांचे श्रेष्ठत्व दिसून येते. त्यांचा विचार आपण समजुन घेतला पाहिजे. त्याच बरोबर लालबहादूर शास्त्री यांनी या देशाचे नेतृत्व केले. आपल्या अल्प कालावधीत आपल्या कर्तृत्वाची छाप त्यांनी पाडली. अगदी सामान्य परिस्थितीतून पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेले शास्त्रीजी शेवटीही सामान्यच परिस्थितीमध्ये होते. अशा या दोन्ही महान व्यक्तीला आपण अभिवादन करू. त्यांचे विचार आत्मसात करु. ती आजच्या काळाची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविकामध्ये सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विनोदसिंह पाटील यांनी गांधीजींच्या जीवना विषयी मत मांडले. त्यांच्या “मेरा जीवन ही मेरा चरित्र है” या वाक्यातून त्यांची असामान्य जीवनाचा परिचय होतो. त्यांनी अहिंसा तत्वाने अख्ख्या जगाला भुरळ घातली, आणि सत्याची कास जगाने धरली. त्यांच्या सर्वधर्मसमभाव तत्त्वांची आवश्यकता किती आहे याची प्रचिती आज आपल्याला कळते. अशा त्यांच्या प्रत्येक जीवन तत्त्वाचा जगाने स्वीकार केला. त्याचबरोबर जय जवान जय किसान या घोषणेचे प्रणेते लालबहादूर शास्त्री यांनी देशात कृषी क्रांती आणि मजबूत सुरक्षा अमलात आणली आणि आपल्या अल्प कालावधीत देशाच्या शेती आणि सुरक्षा सक्षमीकरणाचे धोरण हे क्रांतिकारक ठरवून देश पुढे नेण्याचे काम केले.
कार्यक्रमात विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रा. जगदीश राणे यांनी मानले.