*कोकण Express*
*एडगांव संस्थेचे चेअरमन म्हणून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या श्री. गोविंद रावराणे यांचा श्री. प्रमोद रावराणे यांच्या हस्ते सन्मान…*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
श्री रवळनाथ विकास सेवा सोसायटी लि. एडगांव ची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत संस्थेचे चेअरमन म्हणून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या श्री. गोविंद बळवंत रावराणे यांचा वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे व्हा.चेअरमन,माजी सरपंच श्री. प्रमोद रावराणे यांनी शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला.
यावेळी माजी सभापती श्री. जयेंद्र रावराणे, सचिव श्री. प्रदीप पार्ट, व्हा. चेअरमन श्री. राजू पवार, सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनिल रावराणे, संचालक श्री. साबाजी रावराणे, श्री. विनोद रावराणे, श्री. सुरेश घाडी, सौ.सरीता घवाळी, श्री. बाबु अडुळकर, श्री. प्रविण रावराणे, श्री. श्रीधर सावंत, श्री. प्रताप रावराणे, श्री. योगेश पवार, सौ. वनिता पवार, श्री. संतोष पाष्टे , श्री. अंबाजी रावराणे, श्री. नाऊ लांबोर इत्यादी सभासद उपस्थित होते.
४४८ सभासद असलेल्या या संस्थेची स्थापना सुमारे ५७ वर्षापूर्वी म्हणजे १९६४ सालात झाली असून गेल्या ५७ वर्षात ११ वेळा झालेल्या पंचवार्षिक निवडणूका गावकऱ्यांनी एकत्र येत प्रत्येक वाडीला, गावातील प्रत्येक समाजाला संचालक मंडळात प्रतिनिधीत्व देत आजपर्यंत बिनविरोध निवडणूकीचा इतिहास रचला. निवडणूकीवर होणारा संस्थेचा अनावश्यक खर्च,वादविवाद टाळून गावात शांतता – सुव्यवस्था निर्माण करीत तालुक्यात एक आदर्श निर्माण केला व आपल्या पूर्वजांनी ५७ वर्षापूर्वी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत लावलेल्या या सहकाराच्या रोपट्याला जोपसण्याचे काम आजपर्यंत सर्वानीच केले.
आपले कार्यक्षेत्र व सभासद संख्या ही अत्यंत कमी असून ही गावातील गोरगरीब,सर्वसामान्य शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून कृषी विषयक अनेक योजना राबवित गावातील बहुतांशी क्षेत्र हे शेती व बागायतीखाली आणले.
संस्थेने शेती व शेतीपुरक व्यवसाय करीत असताना प्रगतीचे नवीन टप्पे गाठीत ९ लाखा पर्यंत भांडवल निर्माण केले. गुंतवणूक आणि ठेवी ६ लाखाच्या घरात नेल्या, ४ लाखांचा निधी उभा केला, तर चालू वर्षात आठ लाखाचे कर्ज वितरण करीत संस्था १,३९,००० रु. निव्वळ नफयात आणली. गेल्या पाच वर्षाच्या लेखा परिक्षणात ‘ब’ वर्ग राखत सातत्य ठेवले.
संस्थेच्या आजपर्यंतच्या प्रगतीशील वाटचालीत संस्थेचे विद्यमान सचिव श्री.प्रदिप पार्टे, गेल्या ५७ वर्षातील आजी माजी चेअरमन, सचिव, संचालक या सर्वाचाच सिंहाचा वाटा असून या सर्वसाधारण सभेत या सर्वाचेच अभिनंदन आणि आभार माजी सरपंच श्री. प्रमोद रावराणे यांनी मानले.