*कोकण Express*
*जिल्ह्यातील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे ७ ऑक्टोबर पासून सुरू…*
शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे ७ ऑक्टोबर पासून सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी मानक कार्यप्रणाली/मार्गदर्शक तत्वे आज जारी केली आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रा बाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे ०७ ऑक्टोबर पासून खुली करणेसाठी सोबतच्या परिशिष्ट – अ मध्ये नमुद मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणेच्या अटीस अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे. प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळांच्या वेळेबाबत संबंधीत विश्वस्त/ मंडळ/ अधिकारी यांनी निर्णय घेण्याचा आहे. मास्क परिधान करणे, शारीरिक आंतराचे पालन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे आणि वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.
सर्व सबंधीत प्रतिबंधीत क्षेत्रा बाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे यांच्याकडून परिशिष्ट – अ मध्ये नमुद मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याबाबत तपासणी करण्याचे अधिकार त्या त्या क्षेत्रातील पोलीस अधिकारी/कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येत आहेत.
यापूर्वी कोविड -१९ व्यवस्थापनासाठी या कार्यालयाकडून विहित केलेले दिनांक १२ ऑगस्ट २०२१ रोजीचे, आदेश आणि त्यात उल्लेख असलेल्या बाबी या सर्व निर्बंधासह पुढील आदेश होईपर्यंत तशाच लागू राहतील.
उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता १८६० (४५) च्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशाराही जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिला आहे.