*कोकण Express*
*जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्जासाठी “बळीराजा प्लस” योजना*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या “बळीराजा प्लस” शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या मुलांना व्यवसायिक व मेडिकल शिक्षणासाठी ९% व्याजाने कर्ज दिले जात आहे. दरम्यान यावर्षीपासून हे कर्ज घेऊन विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे व्याज पूर्णतः माफ केले जाणार आहे. तर ही रक्कम बँकेच्या नफ्यातून दिली जाईल, अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज येथे दिली. दरम्यान जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वडील सोसायटीचे सभासद असण्या बरोबरच त्यांच्या सातबारावरील जमीन ही लागवडीखाली असणे आवश्यक आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री.सावंत बोलत होते. यावेळी बँकेचे संचालक व्हीक्टर डॉन्टस, कणकवली नगरसेवक सुशांत नाईक आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, हा निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने घेतला असून यामागे शेतकऱ्यांची मुले पुढे जाणे हा यामागील मुख्य हेतू आहे. दरम्यान आपल्या वडीलावरील कर्जाचा भार कमी करण्यासाठी मुलांनी केवळ अभ्यासाकडे लक्ष द्यावे, या उद्देशाने त्यांना यावर्षीपासून ही विशेष सुविधा देण्यात आली आहे। त्यानुसार विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे व्याज पूर्णतः माफ केले जाणार आहे. तर फर्स्ट क्लास पास झालेल्या विद्यार्थ्याला ७५% व सेकंड क्लास पास झालेल्या विद्यार्थ्याला ५० % व्याजात सवलत दिली जाईल, माफ केलेले व्याज हे बँकेच्या नफ्यातून जमा करण्यात येणार आहे. तर या सुविधेचा एक ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांची मुले लाभ घेऊ शकतात, मात्र लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वडील हे सोसायटीचे सभासद असणे बंधनकारक आहे. तसेच त्यांच्या सातबारावरील जमीन ही लागवडीखाली असणे आवश्यक आहे. तर हे कर्ज केवळ व्यवसायिक व मेडिकल शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले जाईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे जास्तीत-जास्त शेतकऱ्यांच्या मुलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.