*कोकण Express*
*राज्य सरकारने परीक्षा अचानक रद्द केल्याने लाखो तरुणांच्या आशेवर पाणी…*
*तीन पक्ष स्थापन झालेले सरकार राज्यातील तरुणांच्या भविष्याचा खेळखंडोबा करत आहे ; परशुराम उपरकर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आरोग्य विभागाची परीक्षा अगदी तोंडावर आली असताना राज्य सरकारने परीक्षा अचानक रद्द केल्या आणि लाखो तरुणांच्या आशेवर पाणी ओतले. आधीच कोरोनामुळे रोजगारावर परिणाम झाला असताना आरोग्य विभागातील भरतीकडे अनेक बेरोजगार तरुण लक्ष लावून बसले होते. शेकडो मैलांचा प्रवास करत मुलं परीक्षेसाठी गेली होती. परंतु ऐनवेळी परीक्षा रद्दचा आदेश आला आणि मुलांचा हिरमोड झाला. खरंतर, तीन पक्ष मिळून स्थापन झालेल्या या सरकारचे प्रतिनिधी श्रेयवादासाठी राज्यातील तरुणांच्या भविष्याशी खेळ खेळत आहेत, अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे.
गेली दोन वर्षे सरकार आरोग्य विभागातील भरतीची घोषणा करतेय. पोलीस भरती आणि MPCB च्या भरतीचीही घोषणा करतेय. परंतु सरकारच्या गलथान कारभारामुळे ही भरती प्रक्रिया अजून लांबणीवर पडलीय. एका बाजूने नोटबंदी, कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या असताना आणि सरकारी नोकऱ्यांसाठी मोठी स्पर्धा चाललेली असताना राज्य सरकार या तरुणांची चेष्टा करण्याचं काम करतंय. नोकऱ्यांसाठी तरुणवर्ग अगदी मेहनतीनं अभ्यास करतोय. कोरोना काळात नेमलेल्या आणि नंतर सेवेतून कमी केलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनाही या भरतीत प्राधान्य मिळून सरकारी नोकरी मिळण्याची आशा होती. पोलीस भरतीसाठी अनेक वर्षांपासून मुलं शारीरिक सराव करतायत. त्यांचीही परीक्षा कधी होईल, याबाबतीतही प्रश्नचिन्हच आहे. त्यामुळे मुलांचा हिरमोड झालेला आहे. आरोग्य विभाग भरती प्रक्रियेसाठी जी कंपनी नेमण्यात आली होती, ती कंपनीच बोगस होती. सरकारच्या या चुकीच्या निर्णयामुळे हा भरतीप्रक्रियेत खेळखंडोबा निर्माण झाला आहे. त्यामुळे परीक्षार्थींना आणि त्यांच्या पालकांना हा भुर्दंड सोसावा लागतोय. सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे भरती प्रक्रियेला विलंब झालेला आहे. त्याचा फटका रात्रंदिवस मेहनतीने अभ्यास करणाऱ्या मुलांना बसता कामा नये. त्यामुळे सर्व प्रवर्गातील ज्या परीक्षार्थींनी दोन वर्षांपूर्वी परिक्षेचा अर्ज भरलेला आहे, त्यांना दोन वर्ष मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी परशुराम उपरकर यांनी केली आहे. तसेच सरकारच्या या गलथान कारभाराला येणाऱ्या निवडणुकीत हे युवकच योग्य ती दिशा दाखवतील, असा इशाराही उपरकर यांनी दिला आहे.