जिल्हा बँकेकडून सभासद संस्थांना १५ टक्के लाभांशची शिफारस

जिल्हा बँकेकडून सभासद संस्थांना १५ टक्के लाभांशची शिफारस

*कोकण Express*

*जिल्हा बँकेकडून सभासद संस्थांना १५ टक्के लाभांशची शिफारस…*

*सतीश सावंत; २९ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत मिळणार मान्यता….*

*ओरोस २३:*

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत बँकेच्या ११७७ सभासद संस्थांना १५ टक्के लाभांश देण्यात येणार आहे. तशी शिफारस संचालक मंडळाने केली असून २९ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने हा लाभांश सभासद संस्थांना दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मार्च २०२१ अखेर बँकेस सर्व आवश्यक तरतूदी करून १४ कोटी रुपये एवढा निव्वळ नफा झाला. कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे बँकेच्या कर्ज वसुलीवर परिणाम झाला असला तरी बँकेच्या नफ्यामध्ये दरवर्षी वाढ होत आहे. गतवर्षी रिझर्व्ह बँकेने कोरोना साथीचा विचार करून संस्थांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होवू नये म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकांनी लाभांश वाटप करू नये. त्याऐवजी लाभांश प्राप्त रक्कम भांडवलामध्ये गुंतवणूक करून बँकेची स्थिरता आणावी असे सुचविले होते. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती चांगली असूनही बँकेने लाभांश दिलेला नव्हता.

जिल्हयातील सहकारी संस्था या जिल्हा बँकेच्या सभासद संस्था असून बँकेच्या भागभांडवलामध्ये त्यांचा प्रमुख वाटा असतो. या भागावर मिळाणारा लाभांश हा संस्थांसाठी महत्वाचा असून त्याच्या संस्था आपल्या सभासदांना लाभांश देत असते. सिंधुदुर्ग बँकेने गतवर्ष वगळता अन्य आर्थिक वर्षामध्ये मार्च २०१७ मध्ये ९.७५ टक्के, मार्च २०१९ मध्ये १०.५० टक्के, मार्च २०१९ मध्ये १०.६० टक्के असा चढत्या क्रमाने लाभांश दिला होता. बँकेच्या संचालक मंडळ सभेमध्ये यावर सविस्तर चर्चा होवून, बँकेने संस्थांना सरासरी दिला जाणारा लाभांश विचारात घेवून गतवर्षी राहिलेला लाभांश पुढील एक ते दोन वर्षात टप्या-टप्याने संस्थांना दयावा. चालू वर्षी नियमित लाभांश म्हणून १० टक्के व मागील वर्षापोटी ५ टक्के मिळून एकूण १५ टक्के लाभांश देण्याची शिफारस वार्षिक सर्वसाधरण सभेस केली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी दिली. बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा २९ सप्टेंबर, २०२१ रोजी होणार असून सदर सभेच्या मान्यतेने संस्थांना लाभांश आदा करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!