*कोकण Express*
*निलेश राणेंची प्रमुख उपस्थिती छत्रपतींच्या पुतळ्याचे १५ ऑक्टोबरला भूमिपूजन…*
*संजू परब; तब्बल ४० फूट उंच हा पुतळा असणार*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
शहरात उभारण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन येत्या १५ ऑक्टोबरला माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. तर तब्बल ४० फूट उंच हा पुतळा असणार असून त्यासाठी पालिकेकडून वर्क ऑर्डर मिळाली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे दिली. दरम्यान पालिका स्तरावर उभारला जाणारा हा जिल्ह्यातील पहिलाच भव्यदिव्य पुतळा असणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत श्री.परब यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी नगरसेवक मनोज नाईक, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा असावा, अशी मागणी गेली पाच ते सहा वर्ष होत होती. याच माध्यमातून हा पुतळा उभारण्यासाठी आपले प्रयत्न सुरू होते. दरम्यान आपण नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व निविदा काढण्यात आल्या. त्यानुसार पालिकेकडून त्याला वर्क ऑर्डर मिळाली असून तब्बल चाळीस फूट उंच असा भव्य दिव्य महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. तर त्याच्या चबूतऱ्याची उंचीच तब्बल पंधरा फूट असणार आहे. अश्वरुढ असलेला महाराजांचा हा पुतळा येथील भोसले उद्यानात उभारण्यात येणार आहे. त्याच्या भूमिपूजनाचा शुभारंभ श्री.राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शहरातील सर्व नागरिकांनी तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.