*कोकण Express*
*कणकवलीत गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…गणपती चालले गावाला…चैन पडेना आम्हाला…अशा जयघोष करत लाडक्या बाप्पाला निरोप*
*बाप्पाला निरोप देताना भक्त गहिरवले…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…गणपती चालले गावाला…चैन पडेना आम्हाला…अशा जयघोष करत दहा दिवस मनोभावे भक्ती केल्यानंतर गणेशभक्तांनी कणकवली तालुक्यातील विविध ठिकाणी विसर्जन स्थळी गणेशमूर्तींचे विसर्जन करून लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. निरोप देताना भाविकांचे अंतःकरण जड झाल्याचे दिसून आले. बाप्पाचा हा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडला.
गणरायाचे घरी आगमन झाल्यानंतर दहा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात पूजा व सेवा झाली. ठिकठिकाणी प्रथेनुसार दीड, तसेच पाच, सात, नऊ व अनंत चतुर्दशी या दिवशी गणरायाला निरोप दिला जातो. अनंत चतुर्दशी दिवशी मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन होत असल्याने नगरपंचायतीच्यावतीने कणकवली शहरात विसर्जन सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली होती. गणपती साना, मराठा मंडळ जवळ, कनकनगर, नाथ पै नगर, निम्मेवाडी या ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात केली होती. गणपती साना येथे विसर्जन मार्गावर टकले हॉटेल जवळ विसर्जनासाठी आलेल्या गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यात आली. गणपती साना येथील स्टेजवर साऊंड सिस्टिम देखील ठेवण्यात आली होती. या मार्गावर विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरत होती. गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नगरपंचायतीचे एक पथक याठिकाणी कार्यरत होते.
दरम्यान, ढोल ताशांच्या गजरात विविध मंडळांनी नियोजनबद्ध सार्वजनिक रित्या विसर्जन केले. यावेळी सार्वजनिक मंडळांच्या गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत महापुरुष मंडळाच्या वतीने सहभागी झालेल्या सिंधु गर्जना ढोल पथकाने सर्वांचच लक्ष वेधले.
विसर्जनासाठी येणार्या गणेशमूर्तीवर न.पं.कडून पुष्पवृष्टी…
गणपती साना याठिकाणी विसर्जनासाठी येणार्या गणेशमूर्तीवर पुष्पवृष्टी कणकवली नगरपंचायतीतर्फे येथील टकले हॉटेलजवळ व्यवस्था उभी करण्यात आली आहे. याचा शुभारंभ प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी करत गणेशमूर्तीवर पुष्पवृष्टी केली. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, तहसीलदार आर.जे.पवार, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक संजय कामतेकर, अभिजीत मुसळे, बंडू गांगण, श्री. पेडणेकर न.पं.चे कर्मचारी मनोज धुमाळे, प्रशांत राणे, श्री. मोरये, श्री. राठोड यांच्यासह गणेशभक्त उपस्थित होते. या मार्गावर न.पं.केलेली विद्युत रोषणाई व राजकीय पक्षांनी लावलेले बॅनर लक्षवेधी ठरत होते. दरम्यान, प्रांताधिकारी व पोलीस निरीक्षकांनी नगरपंचायतीने केलेल्या विसर्जन सोहळ्याच्या नियोजनाची पाहणी केली.

