*कोकण Express*
*कोरोना काळात तब्बल पंधराशे हून अधिक मृत्यूमुखी ; तरी आरोग्य यंत्रणा सुस्त…*
*परशुराम उपरकरांचा आरोप; आगामी निवडणूकांत मनसे नशीब आजमावणार…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
कोरोना काळात तब्बल पंधराशे हून अधिक मृत्यू सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले आहेत. परंतु आजपर्यंत फिजिशियन आणि सर्जन जिल्ह्यात नेमले जात नाहीत. आश्वासनाच्या नावाखाली यंत्रणा सुस्त आहे. त्यामुळे तिसरी लाट आल्यास जिल्हा प्रशासन काय करणार? असा सवाल आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी व्यक्त केला. दरम्यान येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या निवडणुका मनसे लढणार आहे. त्या ठिकाणी आमचे नशीब आजमावण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. श्री. उपरकर यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी उपजिल्हाध्यक्ष दयानंद मेस्त्री, शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, मुबंई नाविक सेनेचे ऋग्वेद सावंत, अभय देसाई, लक्ष्मीकांत हरमलकर आदी उपस्थित होते. यावेळी उपरकर म्हणाले, या ठिकाणी पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यालाचे पॅकेज जाहीर केल्याची घोषणा केली आहे. मात्र प्रत्यक्षात हे पॅकेज फसवे आहे. या ठिकाणी असलेल्या सरकारची मुदत ही तीन वर्षांची आहे. मग चार वर्षात ते कसाकाय निधी देणार, पुढच्या वेळी आपणच असणार असे सांगून ते लोकांची फसवणूक करत असल्याचा दावा श्री. उपरकर यांनी केला.