*कोकण Express*
*बिबट्याची कातडी विक्री करणाऱ्या ५ जणांना सापळा रचून गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले*
सावंतवाडी ः प्रतिनिधी*
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने बिबट्याची कातडी विक्री करण्याच्या उद्देशाने देवगड येथून सावंतवाडी शहरात आलेल्या ५ जणांना सापळा रचून रंगेहाथ पकडले. आज दुपारी मळगाव घाटात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये साडेतीन लाखाच्या बिबट्याच्या कातडी सह क्वालिस गाडी असा एकूण साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
देवगड येथून सावंतवाडीच्या दिशेने बिबट्याच्या कातड्याची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. झाराप पत्रादेवी बायपास वरून जळगाव घाट मार्गे सावंतवाडीत येत असताना स्थानिक गुन्हे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी क्वालीस गाडीतील तस्करांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून बिबट्याचे सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे कातडे हस्तगत केले. तसेच या प्रकरणात वापरण्यात आलेली क्वालिस गाडी ही ताब्यात घेण्यात आली. या तस्करीप्रकरणी समीर सूर्यकांत गुरव (पेंढरी देवगड ), नितीन प्रकाश सूर्यवंशी, ( माजगाव तांबळ गोठण )व्यंकटेश दत्ताराम राऊळ (सावंतवाडी) किरण राजाराम सावंत (चराठा) दिनेश काशिराम गुरव (पेंढरी देवगड) या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचा ताबा वन विभागाकडे देण्यात आला आहे शुक्रवारी त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.