*कोकण Express*
*वारस हक्क नोंद प्रकरणी कणकवली तालुक्यात ३६ ठिकाणी शिबिरे; चाकरमानी व स्थानिक खातेदारांनी लाभ घेण्याचे आवाहन…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
गणेश चतुर्थीच्या काळात अनेक चाकरमानी गावी असताना या कालावधीत महसूल विभागामार्फत आता वारस तपास नोंद शिबिराचे आयोजन कणकवली तालुक्यात करण्यात आले आहे. कणकवली तालुक्यात प्रत्येक तलाठी साजा निहाय ही शिबिरे घेण्यात येणार असून, चाकरमानी व स्थानिक खातेदारांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले आहे.
कणकवली तालुक्यातील सहा मंडळ निहाय या वारस तपास नोंद शिबिरा चे आयोजन करण्यात आले आहे. यात कणकवली मंडळांतर्गत कणकवली तलाठी कार्यालयामध्ये, कलमठ / तरंदळे, बिडवाडी/हुंबरणे, वरवडे, नागवे, हरकुळ बुद्रुक या सजेतर्गत तलाठी कार्यालयाच्या ठिकाणी १५ सप्टेंबर रोजी हे शिबिर होणार आहे.
तर वागदे कळसुली मंडळाअंतर्गत वागदे/ हळवल, बोर्डवे, ओसरगाव, कळसुली/उल्हासनगर, शिवडाव/दारस्ते, शिरवल या सजेच्या ठिकाणी देखील १५ सप्टेंबर रोजी हे शिबिर होणार आहे.
तर सांगवे मंडळांतर्गत भिरवंडे, सांगवे/शिवाजीनगर, कुंभवडे, नाटळ, दिगवळे, नरडवे, या ठिकाणीदेखील १५ सप्टेंबर रोजी हे शिबिर होणार आहे. तर तळेरे – खारेपाटण मंडळांतर्गत तरळे, ओझरम, कासार्डे/ दक्षिण-उत्तर गावठाण, जांभळगाव, खारेपाटण/नडगिवे, वारगाव, शेर्पे या ठिकाणीदेखील १५ सप्टेंबर रोजी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
फोंडाघाट मंडळांतर्गत फोंडाघाट, लोरे, घोणसरी, करंजे, हरकुळ खुर्द, करूळ/डांमरे या ठिकाणी १५ सप्टेंबर रोजी हे शिबिर होणार आहे. तर नांदगाव – हुबरट मंडळांतर्गत नांदगाव /तोंडवली, ओटव, कोळोशी/ असलदे, हुबरट, जानवली, वाघेरी याठिकाणी वारस तपास नोंद शिबिराचे आयोजन त्या-त्या ठिकाणच्या सजे अंतर्गत च्या तलाठी कार्यालयांमध्ये करण्यात आले आहे.
सदर शिबिराच्या ठिकाणी खरेदी विक्री व्यवहार, जमिनीची वाटणी, गहाणखत, हक्कसोडपत्र, वारसाहक्क, बक्षीसपत्र, दत्तकपत्र, कर्ज, विहिरीची नोंद, वन नोंदी, भूसंपादन नोंदी, कुळवहिवाटीच्या नोंदी, सात- बारा दुरुस्ती साठी नवीन अर्ज स्वीकारणे, जुन्या हस्तलिखित अभिलेखावरून खात्री करणे, तलाठी यांनी कलम १५५ अन्वये ऑनलाईन प्रस्ताव दाखल करणे, तसेच मंडळ अधिकारी यांनी तहसीलदार यांचे स्वाक्षरी आदेश पाहून फेरफार नोंदी प्रमाणित करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. तसेच वारसहक्क प्रणालीतून आलेले सर्व ऑनलाईन अर्ज या कॅम्पमध्ये निर्गत केले जाणार आहेत.
या शिबिराच्या ठिकाणी तहसीलदार, नायब तहसीलदार उपस्थित राहणार आहेत. तसेच सदर शिबिरेही प्रांताधिकारी यांच्या पर्यवेक्षण खाली घेण्यात येणार आहेत. वर्षानुवर्षे प्रलंबित राहणाऱ्या वारसाहक्काच्या किंवा त्या अनुषंगाने इतर नोंदी निपटारा होण्याच्या दृष्टीने कणकवली तालुक्यात या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, गणेशोत्सवासाठी आलेले चाकरमानी खातेदार व स्थानिक गावात राहणाऱ्या खातेदारांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले आहे.