*कोकण Express*
*अल्पमुदत कर्ज परतफेड करणाऱ्या संस्थाना लाभांश वाटप सुरू*
*ओरोस ः प्रतिनिधी*
अल्पमुदत कर्ज घेणाऱ्या संस्था सभासदांचे व्याज परतफेड लाभांश रक्कम केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त झालेली नाही. २०१८-१९ व २०१९-२० या दोन वर्षांची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे संस्था अडचणीत आल्या आहेत. या संस्थाना आधार मिळावा या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने आपल्या स्वनिधीतून २०१८-१९ ची व्याज परतफेड लाभांश रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे वितरण आज बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपाध्यक्ष सुरेश दळवी, संचालक अविनाश माणगांवकर, राजन गावडे, आत्माराम ओटवणेकर, अतुल काळसेकर, प्रकाश गवस, प्रमोद धुरी, वि भा सावंत उपस्थित होते. यावेळी मोजक्या संस्थाध्यक्षांना बोलावून याचा शुभारंभ करण्यात आला. अल्प मुदत पीक कर्ज घेणाऱ्या संस्था सभासदांचे तसेच थेट सभासदांचे २०१८-१९ व २०१९-२० चे अल्प मुदत व्याज क्लेम जिल्हा बँके मार्फत राज्य शासन व्याज क्लेम आणि सहाय्यक निबंधक कार्यालय मार्फत उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे तसेच केंद्र शासन व्याज क्लेम राज्य बँकेकडे सादर करण्यात आलेले आहे. मात्र कोरोनामुळे ही व्याज क्लेम रक्कम शासनाकडून प्राप्त झालेली नाही. त्याचा विपरीत परिणाम संस्थाच्या आर्थिक स्थितीवर होत आहे. २०१८-१९ ची राज्य व केंद्र शासनाकडून २ कोटी ४३ लाख व्याज क्लेम रक्कम येणे आहे. तर २०१९-२० ची ३ कोटी ८४ लाख रुपये रक्कम येणे आहे. ही रक्कम प्राप्त न झाल्याने संस्थाच्या आर्थिक परिस्थितीवर होणारा दुष्परिणाम लक्षात घेऊन २०१८-१९ ची व्याज क्लेम रक्कम तूर्त बँकेच्या स्वनिधीतून संस्थाना व थेट सभासदांना देण्याचा निर्णय जिल्हा बँक संचालक मंडळाने घेतला आहे. त्यानुसार प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन संस्थाच्या अध्यक्षांकडे व्याज क्लेम रक्कमेचे धनादेश सुपूर्द कर ण्यात आले.