*कोकण Express*
*वैयक्तिक विकासासाठी ‘त्या’ नगरसेवकांनी केला शिवसेना प्रवेश*
*आणखी किती वेळा करणार पक्षप्रवेश ; नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांचा टोला*
*देवगड ः अनिकेत तर्फे*
देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला, तो वैयक्तिक विकासाकरीता केला असून आणखी किती वेळा प्रवेश करणार हे कोडे मात्र उलगडलेले नाही, असा टोला नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांनी लगावला आहे. देवगड – जामसंडे नगरपंचायतीच्या दोन नगरसेवकांनी भाजपाला रामराम करत शिवबंधन बांधले. त्यामुळे राजकीय वातावरणाचा रंग बदलला होता.
विकास कामाकरीता निधी दिला नाही, असे शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी म्हटले आहे. परंतु हा आरोप पूर्णतः चुकीचा असून त्यांच्या प्रभागात विकास कामे झाली आहेत. नगरसेवक विकास कोयंडे यांच्या प्रभाग क्र.८मध्ये १७ विकास कामे,१कोटी १३लाख ८३५/-रकमेची कामे ,तर नगरसेविका हर्षा ठाकूर यांच्या प्रभाग क्र.१४ मध्ये ६८ लाख ९४ हजार रकमेची १७ विकास कामे करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. देवगड जामसंडे नगरपंचायत मधील नगरसेवकांना सर्व प्रभागात विकास निधीचे वाटप करण्यात आले असून सर्व विकास कामांचा दर्जाही चांगला असल्याचा अहवालही प्राप्त आहे. असे असताना नगरसेवकांनी निधी वाटप करण्यात अन्याय झाला, असे सांगून पक्ष प्रवेश करणे हास्यास्पद आहे. वैयक्तिक विकासाकरीता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगून अन्य कुणीही या पुढील काळात जाणार नाहीत. तसेच ऑनलाइन सभा घेणे हे शासन प्रशासनाच्या आदेशानुसार सुरू असून हर्षा ठाकूर यांना ऑफलाईन सभा घ्यावी, असे वाटत असेल तर त्यांनी तसे आदेश शासन प्रशासनाकडून आणावेत. त्यानंतर ऑफलाईन सभा घेतली जाईल. नगरसेवक विकास कोयंडे यांच्या प्रभाग क्र. ८ मध्ये सहाय्य योजनेतून ९ विकास कामे, सर्वसाधरण रस्ता अनुदानातून ३शकामे, १४ वा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर, १ काम, नगरोत्थान मधून १ काम, आमदार स्थानिक विकास निधी मधून ३ कामे अशी १७ विकास कामे १कोटी १३ लाख ८३५/-रु एवढया रकमेची झाली आहेत. तसेच नगरसेविका हर्षा ठाकूर यांच्या प्रभाग क्र १४ मध्ये ६८ लाख,९४ हजार खर्चाची १७ कामे असून ३कामे, सहाय्य योजनेतून, सर्वसाधारण रस्ता अनुदानातून ५ कामे, १४ वा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर १ काम, नगरपंचायत स्वनिधी ४ कामे, नगरोत्थान मधून ५कामे ,यापैकी दोन कामे निविदा प्रक्रिया झाली आहे. उर्वरित कामे पूर्ण झाली असल्याचे नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांनी सांगितले.