*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयात बँकिंग क्षेत्रातील करियर या विषयावरील वेबिनार संपन्न*
*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये महाविद्यालयाचा कॉमर्स विभाग,. आय.क्यू.ए.सी.विभाग व विकास सावंत अकॅडमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बँकिंग क्षेत्रातील करियर या विषयावर आभासी पद्धतीने वेबिनार बुधवार दिनांक 1 सप्टेंबर 2019 रोजी संपन्न झाला.
आत्ताच्या काळात नोकरीची चांगली आणि सोयीची संधी म्हणून बँकिंग क्षेत्राकडे पाहिले जाते. याच अनुषंगाने विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील नोकरीची माहिती मिळण्यासाठी तसेच त्यासाठी घ्यावी लागणारी परीक्षा, याची सखोल माहिती मिळण्यासाठी या वेबिणारचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभाकर मोरे यांनी स्पर्धा परीक्षा आणि यातील बँकिंगची परीक्षा यासंदर्भात वेबिनारचे आयोजन केल्याचे स्पष्ट केले. त्यातच बँकिंग क्षेत्रात ग्रामीण व अमराठी मुलांनी मिळवलेले यश याचाही आढावा त्यांनी घेतला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष रायबोले यांनी थोडे कष्ट आणि चिकाटीने अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेचा मार्ग सोपा असतो
आणि आत्ताच्या व भविष्याच्या काळात नोकरी मिळण्याचा शाश्वत मार्ग म्हणून या बँकिंग स्पर्धा परीक्षांकडे पाहिले जाते. असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विकास सावंत यांनी बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा कशी असते, ती देण्यासाठी आपण कसे तयार असले पाहिजे, याची तयारी कशाप्रकारे करावी याचे मार्गदर्शन केले.येत्या सहा महिन्यातील बँकिंग क्षेत्रातील भरती प्रक्रियेची माहिती दिली. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याची माहिती देऊन परीक्षेला तयार होण्यासाठी करावी लागणारी तयारी, यासाठी आवश्यक असणारे स्टडी मटेरियल किंवा अभ्यासक्रम, ऑनलाईन तासिका याची माहिती त्यांनी दिली हे सर्व करत असताना शहरी भागामध्ये सगळ्या सोयी उपलब्ध असतात, परंतु ग्रामीण भागात कौशल्य असूनही काही तंत्रज्ञान अवगत नसल्यामुळे ग्रामीण, प्रामुख्याने कोकणातील मुले मागे राहतात व त्यांना या संधी स्वस्तात उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने या वेबिनार मध्ये मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाबाबत आपले मत मांडताना कॉमर्स विभाग प्रमुख डॉ. बाजीराव डाफळे यांनी ग्रामीण भागातील मुलांना उपयुक्त असा वेबिनार असे या वेबिनार असे वर्णन केले.
या वेबिणार संदर्भात आपले मत व्यक्त करताना श्री. दीपक सावंत यांनी अशा वेबिनार पासून विद्यार्थ्यांना होणारा भविष्यातील फायदा हा चांगल्या प्रकारचा असेल असे मत व्यक्त केले. यापुढे होणाऱ्या सेमिनारमध्ये जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विकास सावंत सरांच्या बहुमूल्य ज्ञानाचा फायदा करून घेण्याचे व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन यश संपादन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी आभासी पद्धतीने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सौ. पल्लवी तावडे यांनी मानले.