*कोकण Express*
*”तुम लढो हम कपडे संभालते है” अशाच वृत्तीने शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणारे खासदार विनायक राऊत..*
*हायवे टोल वसुली कंत्राटासाठी खासदार विनायक राऊतांची लाचारी*
*मनसे सरचिटणीस उपरकर यांची टीका*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी वेंगुर्लेत राणे पुत्र आमदार नितेश राणेंशी जाहीर केलेल्या मैत्रीमुळे उपरे वगळता निष्ठावान शिवसैनिकांत चीड निर्माण झाली आहे. जनआशीर्वाद यात्रेत केंद्रीयमंत्री राणेंना स्व. बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाण्यास रोखण्याचा आदेश देणारे खासदार विनायक राऊत हे तुम लढो हम कपडे संभालते है अशाच वृत्तीने शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणारे असल्याचे पुन्हा सिद्ध झाल्याचा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला. जेव्हा राणे मुंबईत होते तेव्हा खासदार राऊत कोकणातून टीका करत होते तर जेव्हा राणे सिंधुदुर्गात आले तेव्हा विनायक राऊत मुंबईतून टीका करत होते. एकीकडे हायवे टोलनाका टोलवसुली कंत्राट आपल्या मुलाच्या नावे मिळवण्यासाठी खासदार राऊत लाचारी करत आहेत. डीपीडिसी मिटिंगमध्ये कानात बोलणारे आमदार वैभव नाईक स्वतःच्या मतदारसंघात नसल्याचे दिसून आले. तर पालकमंत्री केवळ ऍक्शन ला रिऍक्शन देणार असे तोंडाची वाफ घालवत रत्नागिरीला निघून गेले. केंद्रीयमंत्री राणेंनी तर विमानातून प्रवास करताना खासदार विनायक राऊत यांनी आपली बॅग घेतो म्हटल्याचे जाहीर भाषणात सांगत विनायक राऊत यांची हमाल म्हणून संभावना केली होती. या टीकेला खासदार राऊत प्रत्युत्तर देतील अशी अपेक्षा होती. मात्र खासदार राऊत मूग गिळून गप्प बसल्यामुळे शिवसैनिकांमध्ये कुजबुज सुरू आहे असेही उपरकर म्हणाले.