*कोकण Express*
*एसटी बस स्थानकासमोर मिडलकटचे काम सुरू*
*संदेश पारकर यांच्या इशार्यानंतर हायवे प्राधिकरणची उपाययोजना*
कणकवली एसटी बसस्थानकासमोर हायवे उड्डाणपूलाखालून गाड्या बाहेर जाण्यासाठी बॅरीकेट्स काढून मिडलकट ठेवण्यासह इतर समस्या तातडीने सोडविण्याविषयी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. समस्या न सोडवल्यास महामार्ग बंद करण्याचा इशारा संदेश पारकर यांनी दिला होता. त्यानंतर महामार्ग प्राधिकरण व हायवे चौपदरीकरण ठेकेदार कंपनीने तातडीने उपाययोजना करत एसटी बसस्थानकासमोर गाड्या बाहेर जाण्यासाठी मिडलकट ठेवण्याचे काम सुरू केले आहे.
कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरण विषयक समस्या सोडविण्याची मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सलीम शेख व उपअभियंता श्री. मन्यार यांच्याकडे केली होती. त्यामध्ये एसटी बस स्थानकामधून बाहेर जाणार्या गाड्यांसाठी उड्डाणपूलाखाली मिडलकट ठेवण्यात यावा, शहरातील अंतर्गत रस्ते, हायवेलगतचे पथदिवे सुरू करावे, दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडचे ड्रेनेज खुले करावे, आरओडब्ल्यूमधील अतिक्रमने त्वरीत हटवावीत, उड्डाणपूलाची गळती दूर करावी, शहरातील हायवेलगतच्या विविध ठिकाणावरील रिक्षा स्टँडसाठी कायमस्वरूपी जागा मिळावी अशा मागण्या संदेश पारकर यांनी केल्या होत्या. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्यांनी 15 दिवसात या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते. या समस्या मार्गी न लावल्यास दोन्ही बाजूचा महामार्ग बंद करू असा इशारा संदेश पारकर यांनी दिला होता.
महामार्ग प्राधिकरणने या समस्या तातडीने सोडवण्याचे हाती घेतले असून एसटी बसस्थानकातील गाड्या बाहेर पडण्यासाठी उड्डाणपूलाखाली दुसरा मिडलकट ठेवला आहे. महामार्गच्यालगत असलेले बॅरीकेट्स काढण्यात आले असून काँक्रीट तोडून वाहने व नागरिकांना सोयीस्कर पडेल असा मिडलकट तयार केला जात आहे. महामार्ग प्राधिकरणकडून सुरू करण्यात आलेल्या मिडलकटच्या कामाची संदेश पारकर यांनी पाहणी केली. माजी सभापती संदेश पटेल, अॅड.हर्षद गावडे, सुशांत नाईक, सचिन सावंत, अजय सावंत आदी उपस्थित होते.