*कोकण Express*
*जिल्ह्यात गोमेय मुर्त्या बनविण्यासाठी 100 मूर्तिकारांना प्रशिक्षण देणार*
*प्रवण फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन महेश संसारे यांनी दिली माहिती*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
हिंदू धर्मात देशी गाईला पवित्र स्थान आहे. प्रत्येक धार्मिक कार्याची सुरुवात ही गायीच्या शेणापासून होत असते. प्रवण कंपनीने गायीच्या शेणापासून बनविलेल्या गणेश मूर्ती यांना मोठ्या शहरात प्रचंड मागणी आहे. तसेच गोमेय मुर्त्यापासून पर्यावरणाचे अनेक फायदे आहेत. ग्रामीण भागात देखील गणेश भक्त या मूर्त्यांना पसंती देतील. तसेच जिल्ह्यात गोमेय मुर्त्या बनविण्यासाठी शंभर मूर्तिकारांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल असे प्रतिपादन प्रवण फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन महेश संसारे यांनी व्यक्त केले. प्रवण फार्मर कंपनी वैभववाडी, लुपिन फाउंडेशन व वेताळ प्रतिष्ठान वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने सात्विक गोमेय गणेश मूर्ती विक्री केंद्राचे उद्घाटन वैभववाडी येथे पार पडले. याप्रसंगी नाबार्डचे प्रतिनिधी अजय थुटे, लुपिन फाऊंडेशनचे प्रतिनिधी योगेश प्रभू, कंपनीचे संचालक प्रमोद रावराणे, सुधीर नकाशे, हिंदुराव पाटील, सीईओ प्रवीण पेडणेकर, श्री मसुरकर, प्रताप रावराणे, राजेश तावडे, श्री. संतोष कुडतरकर, वेताळ प्रतिष्ठानचे सचिन परुळेकर, चंद्रकांत म्हापणकर, किरण राऊळ, व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. महेश संसारे म्हणाले, देशी गाई वाढल्या पाहिजेत. त्या जगल्या पाहिजेत. हाच या मागचा मुख्य उद्देश आहे. यापूर्वी प्रवण कंपनीच्या मार्फत गोमेय पणत्या बनविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. गणपती चतुर्थी हा उत्सव सर्वात मोठा उत्सव मानला जातो. बहुतांश गणेश भक्त प्लास्टर ऑफ प्यारीस च्या मुर्तीची प्रतिष्ठापना करतात. या मुर्त्यांच्या किमती जादा असतात. गोमेय मुर्त्या या स्वस्त व पर्यावरण पूरक अशा आहेत असे सांगितले. अजय थुटे म्हणाले, गोमय मुर्त्यांची वाटचाल उद्दिष्टपूर्तीकडे असली पाहिजे. मूर्तिकारांना प्रशिक्षणाची आवश्यकता असल्यास गावागावात प्रशिक्षणाची सोय उपलब्ध झाली पाहिजे. गणेशभक्त आकर्षित होतील अशा रूपात या मुर्त्या दिसल्या पाहिजेत असे सांगितले. परुळेकर म्हणाले, या कंपनीला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. मूर्तिकारांना निश्चित यातून रोजगार उपलब्ध होईल असे सांगितले.