सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ सप्टेंबर पर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ सप्टेंबर पर्यंत मनाई आदेश

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ सप्टेंबर पर्यंत मनाई आदेश…*

*सिंधुदुर्गनगरी,ता.२५:*

जिल्ह्यात आजपासून ७ सप्टेंबर पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या ३७ (१) (३) नुसार जिल्ह्यात संपूर्ण मनाई आदेश लागू केले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, पोलीस अधीक्षकांनी निदर्शनास आणल्यानुसार सद्यस्थितीत राज्यात वेगवेगळे राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते राजकीय हेवेदाव्यास्तव आमने सामने येवून आंदोलने करीत आहेत. त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटल्यास प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. विविध समाजाच्या आरक्षणावरुन विविध संघटना, राजकीय पक्ष, कामगार संघटना त्यांच्या अषालेल्या मागण्यांच्या संबंधाने न्याय मिळवून घेण्याकरिता आक्रमक झालेल्या असून त्यांच्याकडूनही आंदोलने,निदर्शने होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा प्रश्न नाकारता येत नाही. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल , गॕस दरवाढ व इतर कारणावरुन राजकीय पक्षाकडून टीका टिपणी केली जात आहे. या कारणावरुन राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून आंदोलने, निदर्शने होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यानुसार जिल्ह्यांतील संपूर्ण भूभागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या ३७(१) (अ) ते (फ) आणि ३७ (३) प्रमाणे आज सायंकाळी ६ पासून ७ सप्टेंबर रोजी २४ वाजेपर्यंत मनाई आदेश निर्गमित करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार जिल्हादंडाधिकाऱ्यांनी पुढील कृत्ये करण्यास मनाई आदेश केले आहेत.
शस्त्रे,सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बाळगणे.
अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा जमा करणे. बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे, व्यक्तिंची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्या कारणांमुळे समाजाची भावना दुखविली जाण्याची शक्यता असते.) सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्ये वाद्य वाजविणे.
जिल्ह्यात पाच किंवा पाचपेक्षा जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे, मिरवणुका काढणे व सभा घेणे.
हा हुकूम सरकारी नोकरांना कर्तव्ये व अधिकार बजावणीच्या संदर्भात उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संबंधित पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे. अशा व्यक्तींना आणि लग्न इत्यादी धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
वरील कालावधित मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच ध्वनिक्षेपक वाजविण्याची परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!