*कोकण Express*
*शिवसेना शाखा कार्यालयासह, भरड नाका येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी*
नारायण राणेंचा निषेध ; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची निवेदनाव्दारे मागणी…
*मालवण ः प्रतिनिधी*
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने मालवण तालुका शिवसेना आक्रमक बनली. शिवसेना शाखा कार्यालयासह, भरड नाका येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेध करण्यात आला. त्यानंतर पोलिस ठाण्यात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी धडक देत राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने राज्याच्या दौर्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याचे तीव्र पडसाद जिल्हाभरात उमटले असून शिवसेना आक्रमक बनली आहे. या पार्श्वभूमीवर आज तालुका शिवसेना पदाधिकार्यांनी शिवसेना शाखा, भरड नाका येथे जोरदार घोषणाबाजी करत नारायण राणे यांचा निषेध केला. उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, मुख्यमंत्र्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्या नारायण राणेंचा धिक्कार असो असा घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला.
तालुकाप्रमुख हरी खोबरेकर म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल राज्यातील सर्वसामान्य मराठी बांधवांच्या, तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखावणारे बदनामीकारक वक्तव्य केले आहे. या घटनेचा तालुका शिवसेनेच्यावतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत. राणे यांच्या सध्या सुरु असलेल्या तथाकथित जन आशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून समाजात अशांतता निर्माण करण्याच्या हेतूने राणे हे सामाजिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये सातत्याने करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शांतता व कायदा सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राणे यांच्याकडून होत असलेली वक्तव्ये लक्षात घेता यावर तातडीने कायदेशीर कारवाई होण्याची गरज आहे. जिल्ह्यात काही दिवसांवर गणेशोत्सव आला असतानाच राणे यांची पक्षप्रमुख ठाकरे यांच्या विरोधातील भडक व अशांतता निर्माण करणारी वक्तव्ये ही जिल्ह्यातील शांतता बिघडण्यास कारणीभूत ठरणारी आहे. त्यामुळे राणे यांच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातंर्गत व भारतीय दंड विधान अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत. गुन्हे दाखल न झाल्यास जिल्ह्यात शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा श्री. खोबरेकर यांनी यावेळी दिला.
यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मंदार केणी, गणेश कुडाळकर, बाबी जोगी, दीपा शिंदे, पूनम चव्हाण, आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, तृप्ती मयेकर, अंजना सामंत, नीना मुंबरकर, नंदा सारंग, प्रसाद आडवणकर, किरण वाळके, भाई कासवकर, किसन मांजरेकर, यशवंत गावकर, बाळू नाटेकर यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.