मनसेचे २३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन; ‘अप्पर जिल्हाधिकारी हटाव व पर्यावरण बचाव’

मनसेचे २३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन; ‘अप्पर जिल्हाधिकारी हटाव व पर्यावरण बचाव’

*कोकण Express*

*मनसेचे २३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन; ‘अप्पर जिल्हाधिकारी हटाव व पर्यावरण बचाव’*

*मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन;पर्यावरण प्रेमी, स्वयंसेवी संस्था व जनतेनेही उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे – अमित इब्रामपूरकर*

*मालवण ः प्रतिनिधी*

न्यायालयाच्या आदेशानंतरही सिंधुदुर्गात अवैध मायनिंग उत्खनन वृक्षतोड सुरूच असून सिंधुदुर्ग जिल्हा भकास होण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी व तत्कालीन खनिकर्म अधिकारी जबाबदार आहेत म्हणून जिल्ह्याचे पर्यावरण वाचवण्यासाठी मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली येत्या २३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालसमोर मनसे पदाधिकारी,कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत.या आंदोलनात स्वयंसेवी संस्था,पर्यावरण प्रेमी व जनतेनेही उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केले आहे.

कळणे मायनिंगमुळे डोंगर कोसळून चिखलाचे पाणी ग्रामस्थांच्या शेती आणि घरात घुसले. काळा दगडांच्या खाणी व मायनिंग उत्खननाकरिता २० फुटांपेक्षा जास्त खोल सुरंग लावल्यामुळे जमिनी हादरून डोंगर कपारी हलल्या आहेत.त्यामुळे तेरेखोल,बांदा,कणकवली,कुडाळ,खारेपाटण येथील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी घुसण्याचे प्रमाण वाढले आहे.
त्याचबरोबर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड यामुळे डोंगरातील झाडांच्या मुळाशी घट्ट पकडून ठेवणारे माती डोंगराचे भूस्खलन होत आहे.विहीरींमधील पाण्याचे प्रवाह बंद होत असताना पाणी दूषित होत आहे.कासार्डे येथील अवैध उत्खनना विरोधात मनसे नेते परशुराम उपरकर यांनीच आवाज उठवला होता.परंतु अजुनही प्रशासन अहवालानुसार कारवाई करत नाही. पियाळी कासार्डे व वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे येथे अनधिकृत उत्खननाचा दंड वसूल केलेला नाही.खाणमाफियांसोबत असलेल्या आर्थिक हितसंबंधामुळेच अधिकारी दंड वसूल करत नाहीत.तक्रार केल्याशिवाय कारवाई करत नाहीत.
या सर्व प्रदूषण खनिज प्रकल्पांना अप्पर जिल्हाधिकारी तत्कालीन मायनिंग खनिकर्म अधिकारी जबाबदार आहेत.२०१३ च्या नियमाप्रमाणे रजिस्टर तपासणी किंवा योग्य रीतीने उत्खनन केले आहे किंवा नाही याची पाहणी न करता नियमबाह्य उत्खनन केले आहे यावर भेटी दिलेल्या नाहीत.
असे मुजोर अधिकारी या जिल्ह्यात राहिल्यास पर्यावरणाने नटलेला सुंदर सिंधुदुर्ग जिल्हा भकास होण्यास वेळ लागणार नाही. म्हणूनच मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली २३ ऑगस्ट रोजी करण्यात येणार्‍या ‘अप्पर जिल्हाधिकारी हटाव व पर्यावरण बचाव’ आंदोलनात पर्यावरण प्रेमी,स्वयंसेवी संस्था तसेच जनतेनेही उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!