*कोकण Express*
*कणकवली गटशिक्षणाधिकारी केबिनच्या छप्पराचा भाग कोसळला!*
*सुट्टी दिवशीची घटना; सुदैवाने अनर्थ टळला!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे छप्पर अखेर कोसळले. सुदैवाने गुरुवारी सुट्टीच्या दिवशी हे छप्पर कोसळल्याने कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र गटशिक्षणाधिकारी यांच्याच केबिन मधील भाग कोसळला असून संपूर्ण इमारतच पूर्णतः मोडकळीस आली आहे. त्यामुळे या इमारतीतील सर्व कार्यालये तातडीने अन्यत्र किंवा पंचायत समितीच्या नवीन इमारतीत स्थलांतरित करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पंचायत समितीची नवीन इमारत बांधण्यासाठी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या जुन्या इमारतीच्या पाठीमागील शाळा नंबर 4 मध्ये स्थलांतरित करण्यात आला होता. शाळा नंबर 4 च्या या इमारतीत शिक्षण, कृषी पशुसंवर्धन विभाग कार्यरत आहेत. मात्र ही संपूर्ण इमारत मोडकळीला आली आहे. गेले काही दिवस ठिकठिकाणी पाण्याची गळती होत होती. यातच गुरुवारी सुट्टीदिवशी गटशिक्षणाधिकारी यांच्या केबिन मधील छपराचा काही भाग कोसळला. तर अनेक ठिकाणी इमारतीच्या छपराचा भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे. सुट्टीदिवशी हा भाग कोसळल्याने सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान, पंचायत समितीची नवीन सुसज्ज इमारत तयार असून सभापती मनोज रावराणे यांनी पुढाकार घेत या इमारतीचे शिल्लक काम तसेच ट्रांसफार्मर सहित सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. सद्यस्थितीत इमारत तयार असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र उद्घाटन होईपर्यंत या तीनही विभागाना अन्यत्र किंवा नवीन इमारतीत हलविण्याची आवश्यकता आहे.