*कोकण Express*
*शाळा सुरू करणे काळाची गरज*
*श्री.वामन तर्फे अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघ*
*कणकवली ः संजना हळदिवे*
गेले दीड वर्ष बंद असलेल्या शाळा सुरू करणे ही आज काळाची गरज बनली आहे अन्यथा पिढ्या बरबाद होऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचा मुळ उद्देशच बाजूला पडले असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.वामन तर्फे यांनी केले असून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच शारीरिक व मानसिक विकासावर दिर्घकालीन परिणाम होईल अशी भीतीही व्यक्त केली आहे.आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, मानसिक आणि शारीरिक विकास करण्यासाठी पुर्व तयारी आणि नियोजन करुन शाळा सुरू करण्याचा निर्णय सर्वांनी एकत्र येऊन घ्यावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने अध्यक्ष श्री वामन तर्फे व सचिव श्री गुरुदास कुसगांवकर यांनी केली.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर गेले दिड वर्ष शाळा बंदच आहेत.गेल्या शैक्षणिक वर्षात काही काळ शाळा सुरू करण्यात आल्या परंतु दुसऱ्या लाटेमुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.दहावी-बारावी बरोबरच इतरही वर्गांच्या परिक्षा न घेता पर्यायी व्यवस्था निर्माण करुन विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात घालण्यात आले असे असले तरी विद्यार्थ्यांचा पाया कच्चाच राहीला, विद्यार्थ्यांच्या त्या-त्या वर्गातील क्षमता विकसित झालेल्या नाहीत.अशा परिस्थितीत मुलांना वरच्या वर्गात घालण्यात अर्थ काय?सद्य स्थितीत शाळा सुरू करण्यासंदर्भात विद्यार्थी, पालक,समाज, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक या सर्वांची मानसिकता निर्माण झाली आहे.शाळा बंद असल्याचे गंभीर दुष्परिणाम या सर्व घटकांना जाणवत आहेत.मुलांचा अभ्यासात लक्ष नाही,वाचन संस्कृती जोपासली जात नाही, आॅनलाईनच्या नावाखाली फोनचा गैरवापर होऊन वाईट प्रवृत्ती वाढत आहे, शिस्त, संस्कार यांचा अभाव, इंटरनेट व्यसनाधीनता वाढत आहे, इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही किंवा फोनच उपलब्ध नाही अशी मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत,अभ्यास सोडून इतर गोष्टींकडे विद्यार्थ्यांचे आकर्षक वाढत आहेत असे अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम करणारे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत.
शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळा सुरू करण्यासाठी तयारी व मानसिकता तयार झालेली होती आणि महाराष्ट्रातील अनेक भागात शाळा सुरूही झालेल्या आहेत.कोरोना कधी संपणार आहे हे निश्चित नाही .सद्य स्थितीत कोरोनाचा प्रभाव कमी झालेला असताना संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांना स्वातंत्र्य देऊन आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी शासनाने द्यावी , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्राधान्याने लसीकरण करावे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना दिलेल्या कोरोना ड्युट्या रद्द कराव्यात व शाळा सुरू करण्यासाठी योग्य व आवश्यक मार्गदर्शक सूचना देऊन शाळा सुरू करण्यासाठी शासनाने व शिक्षण विभागाने पावले उचलावीत अशी आग्रही मागणी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने अध्यक्ष श्री.वामन तर्फे व सचिव श्री गुरुदास कुसगांवकर यांनी केली आहे.