जन आशीर्वाद यात्रेपूर्वीच मुंबईत  वादाला सुरुवात

जन आशीर्वाद यात्रेपूर्वीच मुंबईत  वादाला सुरुवात

*कोकण Express*

*जन आशीर्वाद यात्रेपूर्वीच मुंबईत  वादाला सुरुवात*

*पोस्टर्स हटवल्याने राणे समर्थक आक्रमक

*मुंबई दि.१९-:*

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा  आजपासून मुंबईतून सुरू होत आहे. मात्र, या जन आशीर्वाद यात्रेपूर्वीच मुंबईत  वादाला सुरुवात झाल्याचं दिसत आहे. नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी मुंबईत भाजपने लावलेले पोस्टर्स बीएमसीने काढण्यास  सुरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या या कारवाई दरम्यान पोलीस आणि बीएमसी कर्मचाऱ्यांसोबत भाजपच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची सुद्धा झाल्याचं पहायला मिळालं. नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी मुंबईत विविध ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून पोस्टर्स, होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. माहिम भागांत लावण्यात आलेले पोस्टर्स बीएमसी कर्मचाऱ्यांनी काढायला सुरूवात केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे मंत्री झाल्यानंतर प्रथमच मुंबईत येत आहेत. त्यात नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्यांना मोदी सरकारने जनतेत जाऊन आशीर्वाद घेण्यास सांगितले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुंबईतून आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करत असून याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्याच कारण म्हणजे राणे आणि ठाकरे कुटुंब यांचे आजवरचे राहिलेले संबंध आहेत. राणे आपल्या जन आशीर्वाद यात्रे दरम्यान बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार आहेत. त्याला शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी विरोध केला आहे. इतकेच नाही तर राणेंना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळापर्यंत पोहोचू देणार नाही असा इशाराच दिला आहे. शिवतिर्थावर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नारायण राणेंना नाही. शिवसेनाप्रमुखांसोबत बेईमानी करणारा नेता महाराष्ट्रात दुसरा झालेला नाही. अशा माणसाला बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्याचे अधिकार नाही आणि शिवसैनिक ते घेऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे. नारायण राणेंनी वरळी दौरा टाळला? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचं शेड्युल बदलण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघात नारायण राणे यांनी जाणं टाळलं असल्याची माहिती समोर येत आहे. नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या पूर्वीच्या शेड्युलमध्ये वरळी नाका येथे सभा आयोजित केली होती. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात जाणं टाळलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!