*कोकण Express*
*विज समस्यांबाबत ओसरगाव ग्रामस्थांचे महावितरण कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ठिय्या*
*लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन घेतले मागे*
*कणकवली ः प्रतिनिधी*
ओसरगाव येथील विज समस्यांबाबत वारंवार निवेदन देऊन देखील त्याची दखल महावितरणकडून घेण्यात आलेली नाही.कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत आम्हाला ओसरगाव येथील वीज समस्या सोडविण्याबाबत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत केबिन मधून उठणार नाही. असा इशारा ओसरगाव सरपंच प्रमोद कावले यांच्यासह ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना दिला. अखेर येत्या तीन दिवसात ओसरगाव मधील विजेच्या समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. ओसरगाव ग्रामस्थांनी महावितरणच्या विभागीय कार्यालयात कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात धडक देत आक्रमक भूमिका घेतली. लाईनमन व कनिष्ठ अभियंता यांची तात्काळ बदली करा, उद्धट उत्तरे दिल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. कनिष्ठ अभियंता मनमानी काम करतात, वारंवार सांगून प्रश्न सुटत नाहीत, ग्रा. प. मध्ये वायरमनच्या तक्रारी येतात. याबाबत वारंवार तुमचे लक्ष वेधले. मात्र कामात सुधारणा झाली नाही. त्यामुळे आता आम्हाला आश्वासने नकोत. लेखी उत्तर द्या. अशी मागणी करत ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्या दालनातच ठिय्या मांडला. तुम्ही सूचना देऊनही कर्मचारी काम करत नाहीत. मग ग्रामस्थाचें ऐकतील का? आम्ही आता परत सांगणार नाही. आमच्या पद्धतीने आंदोलन करू. असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. काही ग्रामस्थांच्या वीज मीटर जोडणी संदर्भात मागणी केली तरी त्याची कनिष्ठ अभियंता दखल घेत नाहीत. गेल्या वर्षभरात अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होत राहिला. मात्र समस्या सोडविण्यासाठी कोणतेच प्रयत्न झालेले नाहीत. जोपर्यंत ओसरगाव मधील समस्या सुटत नाहीत, तो पर्यंत वायरमन मार्फत विज बिल वसुलीसाठी तगादा लावू नये. अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तशा सूचना वायरमनला आत्ताच आमच्यासमोर द्या. जर अशा स्थितीतही वायरमन कडून वीज बिल वसुलीसाठी प्रयत्न केले गेले तर आमच्यावर केस झाल्या तरी बेहत्तर. मागेपुढे पाहणार नाही. अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली. यावेळी लाईनमन व कनिष्ठ अभियंता यांना आत्ता येथे बोलावून घ्या. अशी मागणी ग्रामस्थांनी केल्यावर श्री मोहिते यांनी कनिष्ठ अभियंता यांना फोन करून तातडीने कार्यालयात या अशा सूचना दिल्या. तुम्ही तेथे काम करत नाही म्हणून लोक समस्या घेऊन येथे येतात. असे खडे बोलही कार्यकारी अभियंत्यांनी कनिष्ठ अभियंत्यांना सुनावले. समस्या सोडवल्या म्हणून जर सांगता तर गावातील स्ट्रीट लाइट बाबत अनेकदा सूचना करून देखील ती दुरुस्त का केली जात नाही. दिवसभर स्ट्रीट लाइट सुरू असते याचा रोष ग्रामपंचायत वर येतो. असे सरपंच श्री. कावले यांनी सांगितले. आतापर्यंत केवळ समस्या मांडत राहिलो. विजेच्या खेळखंडोब्यामुळे ग्रामस्थ कंटाळले आताच निर्णय द्या. अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. त्यानंतर येत्या तीन दिवसात ओसरगाव मधील वीज समस्या मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन कनिष्ठ अभियंत्यांकडून देण्यात आले. त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी उपकार्यकारी अभियंता गिरीश भगत, ओसरगाव सरपंच प्रमोद कावले, उपसरपंच मुरलीधर परब, ग्रा. प. सदस्य हेमंतकुमार तांबे, रिया नाईक, अक्षता राणे, विनोद मोरे, नीलेश मोरे, मुकुंद धुरी, दिनेश अपराध, अक्षय राणे, आदित्य मोरे, महेश वारंग, रोहित राणे, सुरज कदम, हेमंत आंगणे, गणेश मोरे, रोहन राणे, हर्षद राणे आदी उपस्थित होते.