*कोकण Express*
*सावंतवाडी कळसुलकर हायस्कुल समोरील बांधकामे, दुकाने हटवा*
*ओरोस ः प्रतिनिधी*
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचालित, कळसुलकर इंग्लिश स्कूल च्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे ,दुकान गाळे तात्काळ हटऊन वाहतूक कोंडीच्या समस्येतून मुलांचे संरक्षण करावे. अशी मागणी कळसुलकर इंग्लिश स्कूल संस्थेचे अध्यक्ष शैलेश पै व सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर यांनी आज जिल्हाधिकारी के मंजु लक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचालित, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय चे अध्यक्ष शैलेश पै व सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर यांनी आज जिल्हाधिकारी के मंजु लक्ष्मी व जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना निवेदन सादर करून कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वारासमोरील नगर परिषदेच्या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाबाबत तसेच् अवैध धंद्या बाबत लक्ष वेधले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वाराजवळ आणि आजूबाजूला नगरपरिषद रस्त्यावर काही अनधिकृत बांधकामे, दुकान गाळे आहेत. परिसरातील रस्ता अरुंद असल्याने आणि त्यावर ही अनधिकृत बांधकामे झाल्याने सार्वजनिक वाहतुकीला अडथळा होतो. शालेय मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. तसेच शाळेच्या समोर पडक्या इमारतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. कोविड महामारीच्या काळात त्या परिसरात उघड्यावर मलमूत्र विसर्जन केले जात असल्याने सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होत आहे. शाळेच्या कंपाउंडला लागून असलेल्या उघड्या नाल्यात सोडण्यात आलेल्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. मच्छी मार्केट येथे बाजारा दिवशी कायम वाहतूक कोंडी होते. अशातच शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी मुलांना सोडायला येणारे पालक, रिक्षा व अन्य वाहने यांची रहदारी वाढलेली असते. अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते त्यातच या रस्त्यावर अनधिकृत बांधकामे झाल्याने अपघात होऊन विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक, यांच्या तीव्र भावना त्यांनी संस्थेकडे कळविल्या आहेत. याबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधण्यात आले होते मात्र अजूनही धोकादायक बांधकामे आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे त्यानी दुर्लक्ष केलेला आहे. तरी मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करून कळसुलकर इंग्लिश स्कूल समोरील अनधिकृत बांधकामे, दुकान गाळे तात्काळ हटवावेत. तसेच स्वच्छता राखण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत. अशी मागणी करण्यात आली आहे. अवैध धंदे बंद करा सावंतवाडी येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे शालेय विद्यार्थ्यांवर परिणाम होत आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी येथील सुरू असलेले अवैध धंदे कायमचे बंद होण्याकरिता कठोर कारवाई व्हावी. अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे संस्था अध्यक्ष शैलेश पै आणि डॉ. प्रसाद नार्वेकर यांनी केली आहे.