*कोकण Express*
*पूरग्रस्त जिल्ह्यांतील व्यावसायिक, दुकानदारांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा*
कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील सहा पूरग्रस्त जिल्ह्यातील बाधित व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी पुढाकार घेतला आहे. बाधित व्यावसायिकांना ‘ना नफा’ तत्वावर ५ ते ६ टक्क्याने कर्ज उपलब्ध करून देण्याची तयारी बँकांनी दाखवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज हा निर्णय झाला असून त्याचा फायदा दुकानदार, व्यापारी व टपरीधारकांना होणार आहे.
▪️राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी, पूरामुळे अनेक दुकानदार, व्यावसायिक, टपरीधारकांचे मोठे नुकसान झाले आहे. या बाधितांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने बाधित दुकानदार, व्यावसायिक, टपरीधारकांना ५० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. मात्र या आपत्तीतून त्यांना सावरण्यासाठी तसेच त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी सामाजिक बांधिलकी राखत तेथील जिल्हा सहकारी बँकांनी पुढाकार घेतला आहे.
▪️त्यासाठी ना नफा तत्वावर भांडवल उभारणी खर्चापेक्षा (कॉस्ट ऑफ फंड) थोड्या अधिक व्याज दराने बाधित दुकानदारांना कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे पुर आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या आणि पंचनामा झालेल्या पात्र दुकानदार, व्यावसायिक, टपरीधारकांना साधारपणे अवघ्या ५ ते ६ टक्के व्याजाच्या दराने कर्ज उपलब्ध होणार आहे.