*कोकण Express*
*संजय तांबे यांचे कथा लेखन म्हणजे आजचे समाज वास्तव*
*‘विविधा’ कथासंग्रह प्रकाशन सोहळ्यात कवी सोळांकूरकर यांचे प्रतिपादन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
लेखक संजय तांबे यांचे कथालेखन आजचे वास्तव प्रखरतेने मांडते. त्यांच्या कथेतील संवेदनशीलता माणसातील चांगुलपणाला साद घालते. त्यांच्या कथा छोट्या असल्या तरी ते जे सांगू पाहतात त्यातून वाचक अंतर्मुख होत जातो. ही त्यांच्या कथालेखनाची मोठी गुणवत्ता असून भविष्यकाळात त्यांनी सातत्याने आपले कथालेखन करत राहावे, असे प्रतिपादन नामवंत कवी सतीश सोळांकूकर (मुंबई) यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कथालेखक संजय तांबे (फोंडाघाट) यांचा ‘विविधा’ कथासंग्रह कणकवलीच्या प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केला असून त्याचे प्रकाशन कवी सोळांकूकर यांच्या हस्ते करण्यात आले. हा प्रकाशन सोहळा ऑनलाइन आयोजित करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी रमेश सावंत, ललित लेखक प्रा. वैभव साटम, समाज साहित्य सिंधुदुर्गचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर तसेच प्रभा प्रकाशनाचे संचालक अजय कांडर, ‘विविधा’ चे लेखक संजय तांबे आदी उपस्थित होते.
रमेश सावंत म्हणाले, तांबे यांच्या ‘विविधा’ कथासंग्रहातील कथा लेखन मानवी नाते अधिकाधिक घट्ट करत जाते. माणसातील भेद नष्ट व्हावा हेच लेखकाचे काम असते. यासाठीच लेखक लिहित असतो आणि याची प्रचिती ‘विविधा’ हा कथासंग्रह वाचल्यावर आपल्याला येते. सुमारे चाळीस वर्ष निष्ठेने वृत्तपत्रात साहित्य लेखन करणारे तांबे भविष्यात अधिका-अधिक सशक्त कथा लिहू शकतात आणि आपले योगदान मराठी कथेला देऊ शकतात. एवढी गुणवत्ता त्यांच्या कथा लेखनामध्ये आहे. वाचकांनीही त्यांच्या या कथालेखनाला उत्तम असा प्रतिसाद द्यावा.
प्रा. साटम म्हणाले, विविधा पुस्तकातील बहुतेक कथा लेखन हे वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे या लेखनाला शब्दमर्यादा आहे. आजच्या पिढीला हे लघुलेखन अधिक भावेल. लेखक समाजभिमुख असल्याने याचा सहसंबंध थेट समाजाची जोडता येऊ शकतो. आजच्या काळात लेखनाकडे नव्या पिढीचे काही दुर्लक्ष होत असताना लेखनातून समाजभान राखण्याची भूमिका वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने तांबे यांचे हे लेखन प्रत्ययकारी ठरेल, असा मला विश्वास वाटतो.
मातोंडकर म्हणाले, छोटया 16 कथांचा ‘विविधा’ हा कथासंग्रह आहे. या कथांमध्ये सामाजिक विषय अत्यंत ताकतीने हाताळून तांबे यांनी आपण कोणत्या वर्गाबद्धल कथेतून बोलत आहोत, याची प्रचिती दिली आहे. विविध सामाजिक विषयावर मोठी मोठी पुस्तके लिहून जे साध्य होणार नाही, ते या अवघ्या सोळा कथांमध्ये समाविष्ट झालेले आहे आणि विशेष म्हणजे प्रभा प्रकाशनाने हा कथासंग्रह अतिशय सुबकपणे छापला आहे.
यावेळी लेखक तांबे यांनीही विचार व्यक्त केले. अजय कांडर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.